दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; असे दिले जातील भूगोल विषयाचे मार्क्स
दहावीच्या भूगोल या विषयाचा पेपर रद्द झाल्याची माहिती आली पण मुलांना या विषयाचे गुण कसे दिले जाणार याबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला होता. काल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची बैठक झाली. या बैठकीत भूगोलला सरासरी इतके गुण देण्यावर चर्चा झाली.
भूगोलाच्या विषयाला सरासरी गुण देताना मात्र उर्वरित विषयाला किती गुण मिळाले, याचाही विचार होईल. इतिहास, नागरिकशास्त्राचा चाळीस गुणांचा पेपर पूवीच झाला आहे. प्रत्यक्ष पेपर न देता दहावीच्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच अशाप्रकारे गुण मिळत आहेत. कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यातून परीक्षेसाठी सुमारे एक लाख 29 हजार इतके विद्यार्थी सामोरे गेले आहेत.
अन्य विषयांच्या सरासरी गुणांचा विचार करून भूगोलला गुण देण्यासंबंधी काल राज्य मंडळाच्या स्तरावर चर्चा झाली आहे. 480 लेखी गुणांची परीक्षा होणे आवश्यक असताना पेपर रद्द झाल्याने ती 440 गुणांची झाली. भूगोलाच्या चाळीस गुणांचा समावेश केल्यास 480 गुणांची होईल. वरील 120 गुण हे प्रात्यक्षिक परीक्षा, तसेच अंतर्गत मूल्यमापनाचे असतील. - सुरेश आवारी, सचिव, कोल्हापूर विभागीय मंडळ