सप्तशृंगी देवीचे माहेर खान्देश कसे !!!

स्वामी माधवानंद सरस्वती खर्ची आश्रम एरंडोल (जळगाव ) यांनी सप्तशृंगी देवीचे माहेर खानदेश कसे अर्थात ४० देवींच्या उत्पत्तीची मुळ कथा, हा व्हिडीओ you tube वर टाकून जवळपास तीन वर्षे होत आहेत. या काळात २ कोटी ८० लाखांहून अधिक भाविकांनी हा व्हीडीओ बघितला आहे. स्वामी माधवानंद सरस्वती यांनी पुराण कालापासूनच्या यच्चयावत माहितीचा धांडोळा घेऊन, तिचा बारकाव्यासह अभ्यास केला.  त्यांनी सप्तशृंगी देवीचे भ्रमण व अवतारकार्य सुसंगतपणे मांडले आहे. नाथसंप्रदायाची अधिष्ठात्री म्हणून सप्तशृंगी देवीच्या एका वेगळ्या आणि महत्वाच्या पैलूवर प्रकाशझोत टाकला आहे.

¶जोगेश्वरी आखाडा ता. राहुरी जि. अहमदनगर येथील अष्टभैरव, खान्देशामध्ये सप्तशृंगीच्या माहेरी अर्थात सिध्दचंद्रवट तिर्थी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करण्याकरता आले. शिवप्रसन्न होऊन म्हणाले, 'काय मागायचे ते मागा', त्यावर त्यांनी सांगितले, 'आम्हाला संतती नाही', भगवान शिव म्हणाले, 'या जन्मात तुम्हाला संतती नाही. पण या क्षेत्राचे तपपुण्य म्हणून मी तुम्हाला प्रसाद देतो. जा, समोरच्या डोहात स्नान करून या.' स्नान करत असतांना त्यांच्या हाताला बालीकेचा स्पर्श झाला. त्यांनी बालीकेला उचलून भगवान शंकरापुढे ठेवले आणि म्हणाले, 'आम्हाला कन्या सापडली.' त्यावर भगवान शंकर म्हणाले,' मी बोलून गेलो, प्रसाद देतो म्हणून..... तर हा प्रसाद घ्या... हिला लहानाची मोठी करा... हिच्या योगे त्रैलोक्याचा भुभार कमी होईल... महिषासुराच्या वधाला हि कारणी भूत ठरेल.' त्याप्रमाणे त्यांनी तिला लहानाचे मोठे केले... ती वयात आली... त्यांनी तिच्या लग्नाचा विचार केला. पण कन्येने नकार दिला. तिने मातापित्यांना सांगितले,' मी तुम्हाला न विचारता निघून जाईन', त्यावर मातापित्यांनी विचारले, 'कुठे जाणार ?' त्यावर ती म्हणाली, 'जाईन कुठेही तपश्चर्या करण्यासाठी.'  त्यावर माता पिता म्हणाले,' मग असे कर, कुठे तरी जाण्यापेक्षा, जा तुझ्या जन्मस्थानी.' कन्येने जन्मस्थळाकडे प्रयाण केले. मार्गात कुठे स्नान केले, कुठे पूजा केली, कुठे भोजन केले, कुठे विश्रांती घेतली. सिध्दचंद्रवट स्थळापर्यंत अशा २० शक्ती स्थळांची निर्मिती झाली. तिने तिथे घोर तप केले.  त्या तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले आणि म्हणाले,' काय मागायचे ते माग'.  त्यावर ती म्हणाली, 'माझ्या निमित्ताने असुरांचे समुळ मर्दन व्हावे. या पुण्यस्थळी आदिशक्तिचा आवेश अवतार व्हावा. माझ्या नुसत्या स्मरणाने तिन्ही लोकांतील देवांना युध्दप्रसंगी शस्त्र अस्र विद्या मिळावी. त्यायोगे त्यांची दसपट शक्ती वाढावी. त्यामुळे देव कधीच पराजित होणार नाहीत.'  यावर शिव अती प्रसन्न झाले आणि म्हणाले,' आज मी तुझे नामकरण करतो, ....नाम तुझे वज्रेश्वरी.' समोरुन महिषा आला. तो धडक मारणार तेवढ्यात भगवान शिवांनी पार्वतीला सांगितले,' काय बघतेस, उडव त्याचे शिर. ' म्हणून या ठिकाणी माता पार्वतीने सिंहारुढ अष्टभूजा अवतार घेतला. म्हणूनच सिध्दचंद्रवट तिर्थ सप्तशृंगीचे माहेर ठरले. 

¶ कन्याने कोल्हार भगवतीपूर, पिंपरी - निर्मळ, राहाता, कोपरगाव, धुळे पारोळा मार्गे तिचे जन्मस्थळ सिध्दचंद्रवट तिर्थ अर्थात तिच्या माहेरी प्रस्थान केले.  या मार्गावर २० शक्तीपीठांची निर्मिती झाली आहे. आदिशक्ति पार्वती मातेचे सप्तशृंगीच्या रुपातील अवतारकार्य ज्या भुमीत घडले तोच हा परिसर.... सध्याच्या अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, धुळे व नाशिक जिल्ह्यांच्या परीसरात घडलेली घटना, खरोखरच आपल्यासाठी श्रध्येय आहे. स्वामी माधवानंद सरस्वती खर्ची आश्रम एरंडोल ( जळगाव ) यांच्या असीम प्रयत्नातून आणि दिर्घकालीन तपश्येतून ही अनमोल माहिती जनसामान्यांसमोर आली आहे. नाथसंप्रदायाच्या गोरखपूर ( उत्तरप्रदेश) पीठाचे प्रमुख महंत योगी (मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश ) यांनीही ही महत्त्वपूर्ण माहिती आस्थेने जाणून घेतली आहे.

¶ ज्या परिसरात आदिशक्ति पार्वतीमातेचे सप्तशृंगी देवीच्या रुपात अवतारकार्य झाले आहे, तेथील सर्वसामान्यांच्या घराघरात ही माहिती जावी अशी, शिवपूराण कथाकार, रामायणाचार्य, श्रीमद भागवताचार्य, दत्तपूराण, नर्मदापूराण, श्री श्री १००८ आचार्य महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती, श्री सप्तशृंगीचे माहेर (खर्ची आश्रम ट्रस्ट ) एरंडोल, जळगाव, यांची तीव्र इच्छा आहे.......जोगेश्वरी आखाडा ते सिद्धचंद्रवट तिर्थ ते सप्तशृंगी गडापर्यंत ज्या मार्गाने देवी गेली आणि या मार्गाने जाताना ज्या ४० ठिकाणी देवीने विश्रांती घेतली किंवा शयन केले  किंवा भोजन केले, त्या शक्तिस्थानांचे महात्म्य जनतेसमोर आणावे, अशी स्वामी माधवानंद सरस्वती, यांची इच्छा आहे...... तसेच या ४० स्थानांची एक परिक्रमा (नर्मदा परिक्रमेप्रमाणे ) सुरू करावी असाही त्यांचा मानस आहे. या ४० ठिकाणी देवीचा जागर भव्यदिव्य स्वरुपात, सार्वजनिकरित्या व्हावा, अशी त्यांची मनिषा आहे......सप्तशृंगी देवीचे माहेर सिध्चंद्रवट तिर्थ ते सप्तशृंगी गड दिंडी सोहळा साजरा करण्याचा संकल्प सुध्दा त्यांनी केला आहे..... सप्तशृंगी देवीचे या परिसरात घडलेले अवतारकार्य सर्वदुर घराघरात जावे यासाठी स्वामी प्रयत्नशील आहेत. 

¶स्वामींच्या ऐतिहासिक कार्यात सर्व भाविकांनी सहभाग घ्यावा अशी अपेक्षा यानिमित्ताने सर्वच थरातून व्यक्त होत आहे. आदिशक्ति माता सप्तशृंगीच्या कृपाशिर्वादाने या सर्व इच्छा आकांशा नजीकच्या भविष्यात प्रत्यक्षात येतील अशी खात्री आहे... जय सप्तशृंगी माता 🙏